तुळजापुरात आज राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे, ते ही कुत्र्यांच्या रागावरून! भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांच्यात झालेल्या शब्दांच्या फुलबाजीने तुळजापूरकरांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या 40 वर्षाच्या गाजरावरून चाललेली चर्चा आता कुत्र्यांच्या ‘बाईट’वर आली आहे. सिंदफळ येथे आमदार राणा पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला, आणि त्यात अचानक ऍड. धीरज पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह अवतरले. त्यांनी आपल्या ‘निवडणूक जोडी’ला सरकारच्या गाडीतून उतरणाऱ्या कार्यक्रमात का बोलावले नाही, अशी आक्रोशपूर्ण तक्रार केली.
आमदार राणा पाटील यांनी त्यांना “अरे बाळ” असे प्रेमळ संबोधले, पण ‘बाळाला’ शांत करणे हे सोपे नव्हते. गोंधळ वाढताच ऍड. धीरज पाटील कार्यक्रमातून बाहेर पडले. त्याच वेळी पत्रकारांनी त्यांची बाईट घेण्यास सुरुवात केली, आणि तिथेच राणा पाटील यांनी ‘चावणाऱ्या कुत्र्याची बाईट घ्या!’ असा चिमटा घेतला.
ऍड. धीरज पाटील मात्र शांत बसतील, ते का? त्यांनी ताबडतोब आमदार पाटील यांना “डॉबरमॅन” असे संबोधले आणि ‘भू-भू’ असा आवाज काढला.
आता परिस्थिती इतकी तापली आहे की, धीरज पाटील हे ‘आ. राणा पाटील यांनी जनतेला कुत्रा म्हटले आहे’ म्हणून आंदोलन करणार असल्याचे सांगत आहेत. कुत्र्यांच्या ‘बाईट’पासून ते डॉबरमॅनच्या ‘भू-भू’पर्यंत पोहोचलेल्या या वादाने तुळजापुरातील वातावरण राजकीय शोले सारखे तापले आहे.
जनतेला मात्र आता वाटत आहे की, येत्या निवडणुकीत योजनेचे गाजर बाजूला ठेऊन, “कुत्र्यांची” राजकीय कुजबुज ऐकायला मिळणार आहे!