मुंबई: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली असली तरी राज्यात हिंदू युवती अजूनही असुरक्षित असल्याचा दावा करत ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ने रविवारी दादर येथे आंदोलन केले. या आंदोलनात उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी २०१९ ते २०२१ या कालावधीत राज्यातून बेपत्ता झालेल्या एक लाख युवतींच्या चौकशीची मागणी केली. या बेपत्ता युवतींच्या मागे ‘लव्ह जिहाद’ सारखे षड्यंत्र तर नाही ना, अशी शंका व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमावे, अशी मागणी करण्यात आली.
उरण येथील यशश्री शिंदे यांच्या हत्येमुळे राज्यात संताप व्यक्त होत असून, या घटनेची तुलना श्रद्धा वालकर प्रकरणाशी करण्यात आली. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमिया स्कॉड’ स्थापन करण्याची आणि ‘लव्ह जिहाद’च्या तक्रारी गांभीर्याने घेण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि जोरदार घोषणाबाजी केली. शासनाला निवेदन देण्यात येणार असून, त्यावर आंदोलकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.