उमरगा तालुक्यातील कदमापूर येथे शेतातील सोयाबीनचे पीक उपटण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कदमापूर शिवारातील शेत सर्वे नंबर 50/1 येथे शंकर वसंत शिरगीरे (वय 35, रा. कदमापूर) हे आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी खंडू मोतीराम काळे, शिवराज मोतीराम काळे आणि सूर्यभान दत्तु सुरवसे (सर्व रा. कदमापूर) हे तिघे आरोपी घटनास्थळी आले. त्यांनी शिरगीरे यांना “शेतातील सोयाबीनचे पीक का उपटता?” असा जाब विचारला. यावरून वाद निर्माण झाला आणि आरोपींनी शिरगीरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कत्तीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी आरोपींनी शिरगीरे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर शंकर शिरगीरे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खंडू काळे, शिवराज काळे आणि सूर्यभान सुरवसे या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.