तुळजापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा – आई तुळजाभवानीच्या शिखराला सोन्याची झळाळी! होय, मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे. पण, हे स्वप्न साकार होणार की पुन्हा एकदा विकासाच्या नावाने ढोल बडवायचा, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
हवेत उडणारे विकास आराखडे!
सहा महिन्यांत तुळजाभवानी मंदिराचे शिखर मूळ रूपात साकारून त्याला सोन्याचा मुलामा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. पण तेरच्या संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्याचे काय? येरमाळ्याच्या येडेश्वरी मंदिराचा विकास कोणत्या ग्रहावर चालला आहे? नळदुर्गमध्ये बसवसृष्टी येणार होती, तिथे आता फक्त निवडणुकीच्या घोषणा ऐकू येतात! धाराशिव मेडिकल कॉलेज एम्सच्या धर्तीवर होणार होते, अजून जागेचा प्रश्न सुद्धा मिटत नाही, पायाभरणी कधी होणार ? येडशीचे रामलिंग मंदिर माथेरान बनणार होते, पण तिथे अद्याप पर्यटकांना उंचसखल रस्तेच मिळतात!
फोटोशॉप आणि 3D व्हिडीओ पुरे झाले!
तिरुपतीच्या धर्तीवर श्री तुळजाभवानी मंदिराचा विकास होईल, असे सांगितले जात आहे. पण त्यासाठी निधी आहे का? कोणता ठोस आराखडा आहे? की केवळ फोटोशॉप आणि 3D व्हिडीओ दाखवून भाविकांची दिशाभूल करायची? याआधी कौडगाव एमआयडीसीला टेक्सटाईल पार्क होणार होते, तिथे आता माळरान सोडून काहीच नाही!
बोलाचा भात, बोलाची कडी!
राणा पाटील यांच्या घोषणांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर त्या हवेत विरलेल्या दिसतात. विकास आराखडा मंजूर झाला आहे का? निधी संमत झाला आहे का? लाडू प्रसाद योजना तर बासनात गुंडाळली गेली, आता या सोन्याच्या शिखराचे काय होणार?
आई तुळजाभवानीच्या नावाने भाविकांची फसवणूक करणे बंद करा आणि आधी घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करून दाखवा. लोकांना स्वप्न नव्हे, वास्तव हवे आहे!