धाराशिव: लहान मुलांचे लाड पुरवणाऱ्या आजीनेच नातवाच्या जीवावर उठण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंब तालुक्यातील नागझरवाडी येथे नात्यातील वादातून सावत्र आजीने आपल्या नातवाला विषमिश्रित पेढे दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.
उदय भगीरथ माळी असे विषबाधित मुलाचे नाव असून, सध्या त्याच्यावर धाराशिव येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले असून, त्याच्या सावत्र आई भगरेती माळी यांनीच हा कृत्य केल्याचा दावा केला आहे.
पूर्वीही आरोप, आता थेट जीवघेणा प्रयत्न
भागीरथ माळी यांनी सांगितले की, त्यांच्या सावत्र आईने यापूर्वीही त्यांच्यावर खोटे आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. मात्र, या वेळी त्यांनी थेट नातवाच्या जीवावर उठण्याचा पवित्रा घेतला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सुदैवाने नातवाचा जीव वाचला
सुदैवाने मुलावर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेने ग्रामस्थ आणि कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली जात आहे.
याप्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी जवाब नोंदवला आहे, पण अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.